उस्मानाबाद :आता दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील तर सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी

उस्मानाबाद :आता दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतच सुरू राहतील तर सायंकाळी 7 ते पहाटे 5 पर्यंत रात्रीची संचारबंदी

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नवीन आदेश जारी केले आहेत.

यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून घालण्यात आलेल्या निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे . जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील बझारपेठ आणि दुकाने आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू रहातील तर सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी असेल.

गर्दीला नियंत्रित तसेच कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील बाजारपेठ , दुकाने चालू राहण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात येत आहे .आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत ते सुरु राहतील. तथापि , औषधी दुकाने 24 तास चालू राहतील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका , नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये दि. 22 मार्च 2021 पासून पुढील आदेशापर्यंत सायंकाळी 7 ते पहाटे 5 या कालावधीत रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) असणार आहे . या कालावधीत सर्व नगर परिषद, नगर पालिका , नगर पंचायतींच्या हद्दींमधील दुकाने, बाजारपेठा, पेट्रोल पंप आदी आस्थापना बंद राहतील . सर्व अत्यावश्यक बाबी अर्थात आरोग्य विषयक सुविधा, प्रवासी वाहतूक वगळून व्यक्तींच्या हालचालींना कडक प्रतिबंध राहील.

रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) तसेच दर रविवारी असणाऱ्या जनता कर्फ्यूच्या दिवशी अत्यावश्यक सेवांच्या अनुषंगाने उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहील. तसेच नगर परिषद, नगर पालिका , नगर पंचायतींच्या हद्दींबाहेरील क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या लगत असणारे पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहतील. परंतु नगर परिषद , नगर पालिका , नगर पंचायतींच्या हद्दींमध्ये असणा-या पेट्रोल पंपांसाठी रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) तसेच दर रविवारीच्या जनता कर्फ्यूचे पालन करणे अनिवार्य राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 आणि इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. या आदेशाची अंमलबजावणी दि.22 मार्च 2021 पासून लागू असेल .असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: