परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब ; ‘गृहमंत्र्यांकडून महिन्याला १०० कोटींची मागणी’, अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

मुंबई : अँटिलिया जवळ स्कॉर्पिओत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. मात्र, आता परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे दर महिन्याला १०० कोटी वसुलीची मागणी केली असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसुलीची जबाबदारी सचिन वाझे यांना देण्यात आली होती. सचिन वाझे यांना बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुल करण्यास सांगितले होते.

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले 

परमबीर सिंग यांच्या पत्रात केलेल्या आरोपांनंतर तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत आरोप फेटाळले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासन स्वत:चा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.”

ग्लोबल न्युज नेटवर्क: