ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला विरोधकांना टोला

 

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना विरोधकांना जोरदार टोला लगावला होता.

उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा मकरसंक्रांतीचा मुहूर्त चागंला आहे, सर्वांना शुभेच्छा तर देतोच आहे आणि मी नेहमी अशी अपेक्षा करतो की, गोड बोलण्यासाठी तीळ-गुळाची अपेक्षा न करता गोड बोललं तर अधिक चांगलं होतं. आजचा हा कार्यक्रम आहे नेहमी अशा कार्यक्रमच्या वेळेला एक बोललं जातं, तशी एक प्रथा आहे, की आजचा दिन हा सुवर्ण दिन आहे, आजचा दिन सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, आजहा हा क्रांतीकारक क्षण आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणतं विशेषण लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. पण एक सर्वसाधरणपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतही काम तिळगुळ दिल्याशिवाय होत नाही. आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, म्हणून मी म्हटलं की मुहूर्त चांगला आहे कारण इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे. पण एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो, तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणं देखील खूप अवघड मानले जाते असे सुद्धा बोलून दाखविले होते.

 

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

• मकर संक्रांतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा.

• गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न पहाता लोकांसाठी काम केले तर लोक आपल्याशी गोड राहतील आणि आपल्या पाठीशी राहतील, हा गोडवा अनंत काळासाठी टिकून राहील.

• आजचा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस, म्हटले तर क्रांतीचा दिवस.

• शासकीय, प्रशासकीय कारभाराबद्दल बोलतांना तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा गैरसमज आहे. परंतू त्याला छेद देणारा आजचा उपक्रम

• माझी महापालिका, माझे सरकार, त्याच्याशी माझा सुलभपणे संवाद झाला पाहिजे असे नागरिकांना नेहमी वाटते. ती सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देणारी आजची बाब.

• मत मागतांना वाकणारी, झुकलेली माणसं मत मिळाल्यानंतर ताठ होतात पण ज्यांना लोकांसाठी काम करायचे असते ती नेहमीच विनम्र असतात.

• आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका जिने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या

• वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली

• तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल याचा विचार व्हावा

• सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खुप अग्रेसर पण त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का, याचा विचार करायला हवा.

• तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांना होत नसेल तर त्या तंत्रज्ञानाचा काडीचा उपयोग नाही.

• मुंबई महापालिका तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत आहे

 

• वर्षाची सुरुवात खुप चांगली झाली. ५०० चौ.फुटाच्या घरकुलावरील घरपट्टी माफ, मग कोस्टलरोडचा मावळाने पूर्ण केलेला बोगदा आणि आज मुंबईकरांना ८० सुविधा बोटाच्या टीपेवर मिळणे, ही सगळी चांगली कामे.

• जनतेच्या सेवेसाठी काम करतांना महापालिका लपवाछपवी करत नाही

• नवीन तंत्रज्ञानानुसार सुविधा अपडेट करणे मोठे काम आहे महापालिकेने त्याकडे लक्ष द्यावे

• महापालिका आयुक्तांना सुचना, महापालिका म्हणजे नेमके काय, तिचे काम काय आहे हे जनतेला समजून सांगावे, महापालिकेवरचा कामाचा ताण करणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे.

• महापालिका रोज काय काम करते, रोज गटार साफ करते, कचरा उचलते, रोज पाणी देते, धरणे बांधणे असेल ही सगळी कामे महापालिका कसे करते, घाणीत उतरून सफाई कामगार आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असतो या सगळ्याची माहिती नागरिकांना द्यावी.

• ही माझी महापालिका आहे आणि ती देशातील सर्वात उत्तम महापालिका आहे कारण ती जगातील उत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा मला उपलब्ध करून देते याचा अभिमान वाटावा असा हा क्षण.

• कोविड काळात महापालिकेचे काम कौतूकास्पद

• कौतूकासाठी काम करत नाही कर्तव्य म्हणून करतो.

• स्वत: काही करायचं नाही पण महापालिका काय करते हा प्रश्न काहीजण नेहमी उपस्थित करतात.

• माझे महापालिकेतील आणि सरकारमधील सहकारी भक्कमपणे काम करत असल्याने मी लोकप्रिय मुख्यमंत्री. त्यांची साथ असल्याने मुंबईचे कौतूक जागतिकस्तरावर. मी त्यांना नम्रपणे नमस्कार करतो. पुढच्या कोणत्याही कामासाठी जिथे सरकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते देण्याचे मी वचन देतो.

Team Global News Marathi: