राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजीराजेंनी येत्या १६ जून पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. तसेच आज त्यांनी कोपर्डी येथे भेट दिली होती.
तसेच भेट दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांबरोबर एका झाडाखाली बसून जेवण केले होते. मात्र यावेळी संभाजीराजे जेवणाकरिता एका बांधावर बसलेले पाहून त्यांच्यासोबत असलेले सहकारी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. संभाजीराजे हे राजघराण्यात जन्मलेले परंतु सर्व सामान्य रयतेमध्ये सहजपणे मिसळून जाणारे राजे आहेत. आज पर्यंत अनेकदा याचा अनुभव आला आहे. शेतकऱ्यांच्या सोबत त्यांची कुरी (कुळव) ओढू लागणारे छत्रपती संभाजी राजे. बैलगाडीत आरूढ होणारे संभाजीराजे. एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत आनंदाने चहा पिणारे संभाजीराजे. असे अनेक रुपात त्यांना आज महाराष्ट्र पाहत आहे.
एकीकडे मराठा आरक्षण मिळण्यासाठी पायाला भिंगरी बांधून संपूर्ण राज्याचा दौरा करताना छत्रपती खासदार संभाजी राजे जनतेला दिसून येत आहे. त्यात राजे असूनही सध्या बांधावर जेवताना दिसणारे राजे आज साऱ्या प्रजेची मने जिंकून घेत आहेत. याआधी सुद्धा खासदार संभाजीराजे पुणे स्थानकावर रेल्वेची वाट बघत एका बॅगेवर बसलेले दिसू आले होते. आज पुन्हा एकदा बांधावर कांदा भाकरी खाताना रयतेचे राजे दिसून आले.