मुंबई लॉकडाऊनच्या वाटेवर? रुग्ण संख्या ४०० पार!

मुंबई लॉकडाऊनच्या वाटेवर? रुग्ण संख्या ४०० पार!

मुंबईत रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे आणि मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,४७९ दिवस एवढा आहे.

मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या आता वाढतच जात असून बुधवारी दिवसभरात ४१६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात करण्यात आलेल्या ४१ हजार कोविड चाचण्यांमध्ये ४१६ रुग्ण आढळून आले आहे. संपूर्ण मुंबईत सध्या ३ हजार १८७ रुग्णांवर विविध ठिकाणच्या जंबो कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

४१ हजार १२९ कोविड चाचण्या करण्यात आल्या!

मुंबईत मंगळवारी जिथे ३० हजार ४३१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ३२३ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी दिवसभरात केलेल्या ४१ हजार १२९ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४१६ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ३२९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के

मृत्यू पावलेल्या ४ रुग्णांपैकी ३ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे होते. यामध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यातील एक रुग्ण हा चाळीशीच्या आतील असून उर्वरीत तीन रुग्ण हे साठीपार आहेत. रुग्ण बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे आणि मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,४७९ दिवस एवढा आहे. झोपडपट्टया आणि चाळी या अजूनही कोरोनामुक्त आहेत. मुंबईतील एकही झोपडपट्टी व चाळी या सक्रिय कंटन्मेंट झोनमध्ये नाही. तर बुधवारी सीलबंद असलेल्या इमारतींमध्ये गुरुवारी तीनची भर पडली आहे. बुधवारी सीलबंद इमारतीची संख्या २९ एवढी होती आणि गुरुवारी ही संख्या ३२ एवढी होती.

मागील आठवड्यातील रुग्ण संख्या

बुधवार १ सप्टेंबर २०२१ : रुग्ण – ४१६ मृत्यू – ४

मंगळवार ३१ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३२३ मृत्यू – १

सोमवार ३० ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३३४ मृत्यू – २

रविवार २९ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३४५ मृत्यू – २

शनिवार २८ ऑगस्ट २०२१ : रुग्ण – ३८८ मृत्यू – ४

शुक्रवार २७ ऑगस्ट २०२१: रुग्ण – ३६४ मृत्यू – ५

ग्लोबल न्युज नेटवर्क: