सिंधुदुर्ग | शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर गुरूवारी त्याना पुन्हा तपासासाठी कणकवलीला नेण्यात आले आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांना अधिक तपासासाठी पुणे येथे नेण्यात येणार आहे. परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी काल, बुधवारी आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षकांनी राणे यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना कणकवलीतून सावंतवाडी येथे आणत येथील पोलीस कोठडीत ठेवले होते.
दरम्यान आमदार नितेश राणे यांना आज, गुरुवारी सकाळीच अधिक तपासासाठी पुन्हा कणकवली येथे नेण्यात आले. तेथे तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी करणार आहेत. त्यानंतर राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलिस अधिक तपासासाठी पुणे येथे घेऊन जाऊ शकतात असा अंदाज आहे.