संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा उभारणार

आज मुंबईत स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळा व्हॅन चे लोकार्पण होत असले तरी भविष्यात ही सुविधा संपूर्ण राज्यात उपलब्ध  करून  देण्यात येईल असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोविड चाचणीची सुविधा उपलबध करून दिल्याबद्दल स्पाईस हेल्थला धन्यवाद दिले.

या तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त श्री. चहल यांनी यावेळी दिली.

एनएबीएल ॲक्रीडेटेड आणि आयसीएमआरची मान्यता असलेल्या स्पाईस हेल्थच्या तीन फिरत्या कोविड चाचणी प्रयोगशाळांचे लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,  स्पाईस जेटचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संजय जयस्वाल, स्पाईस हेल्थचे जुबेर खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

गोरेगाव, बीकेसी आणि एनआयसी डोम वरळी येथील कोविड केंद्रात  या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळा व्हॅनची उपलब्धता करून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेंव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशियातांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध ही घेण्यात आला. कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येतांना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे  आज ही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे  प्राधान्य आहे असे त्यांनी बोलून दाखविले.

Team Global News Marathi: