ओबीसी आरक्षणाशिवायच जिल्हा परिषदेच्या निवडणुका, लवकरच करण्यात येणार तारखा जाहीर !

 

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील पोट निवडणूक OBC आरक्षणाशिवायच होणार आहे. याआधी स्थगित केलेला पोटनिवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे राबविण्यात येईल, असे आयोगाने रविवारी स्पष्ट केले. पोटनिवडणुकीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने शनिवारी दिला होता. कोर्टाचा हा निर्णय ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मनाला जात होता तसेच या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

याआधी १८ जुलै रोजी होणारी ही निवडणूक आहे त्या टप्प्यावर आयोगाने ९ जुलै रोजी स्थगित केली होती. मदान यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वेळी दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाशी चर्चा करून आयोगाने पोटनिवडणूक आहे त्या टप्प्यावर स्थगित केलेली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. तीनचार दिवसात कार्यक्रम जाहीर केला जाईल.

Team Global News Marathi: