आता किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार

मुंबई । राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने राज्य सरकारने राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.मात्र निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावाखाली नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याचे चित्र असल्याने राज्यातील किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.त्यामुळे आता किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू राहणार आहेत.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने येत्या ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला असला तरी,राज्यातील कोरोना रूग्ण वाढीचा वेग अद्याप अटोक्यात आलेला नसून,दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर अनेक नागरिक मोठ्या संख्येने दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ऑक्सिजन निर्मितीबाबत महत्वाचा निर्णय
कोरोनारुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी तात्काळ सुरु करावी. पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करावीत. कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सचिवांनी जिल्हा प्रशासन आणि मंत्रालयातील दूवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देशही अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. देशातील प्रमुख सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी खरेदीसाठी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारलाही यासंदर्भात विनंती करण्यात आली आहे. रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांच्या क्षमतावाढीसाठी सहकार्य करण्यात येत आहे. लवकरच राज्याला पुरेसा रेमडेसिवीर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पुण्यातील ससून रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे,नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (व्हीसीद्वारे),वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (व्हीसीद्वारे), अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: