आता न्यायपालिकेवर विश्वास नाही, जनता हेच न्यायालय, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर आता विरोधकांनी जोरदार टीका राज्य सरकारवर केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह येऊन मराठा आरक्षण मिळवूनच देणार असा विश्वास बोलून दाखविला होता. मात्र सध्या आरक्षण नाकारल्यामुले मराठा संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आज पत्रकार परिषद घेऊन, मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला रोखठोक इशारा दिला आहे. मंत्री अशोक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण रद्द झालं. आता आरक्षणावरुन पळवाटा काढायचं काम सुरू आहे, असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केला. जनता हेच सर्वात मोठं न्यायालय आहे. आता ठोक मोर्चाचा न्यायपालिकेवर विश्वास राहिला नाही, असं आबासाहेब पाटील म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आता आम्ही कोणावर विश्वास ठेवायचं याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे. मुख्यमंत्र्यानी सर्वपक्षीय अधिवेशन बोलवावं. सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका कधी घेणार हे सांगावे. तसंच ओबीसींप्रमाणे फी माफी करावी, अशी मागणी यावेळी आबासाहेब पाटील यांनी केली आहे. सरकार आणि प्रशासन यांच्यात अनागोंदी कारभार सुरु आहे. स्पर्धा परीक्षांमधून निवड झालेल्या मुलांच्या निवडी रद्द करण्याचा हालचाली सुरु आहेत. असा प्रयत्न झाल्यास मराठा समाजाची मुलं मंत्रालयात घुसतील असा इशारा सुद्धा मराठा संघटनेने राज्य सरकारला दिला आहे.

Team Global News Marathi: