आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील; मलिकांचा टोला

 

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्यावर निशाणा साधला असून आता तरी राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील, असा टोला मलिकांनी लगावला आहे.

मंत्री मलिक म्हणाले की, मुख्यमंत्री व राज्यपाल या दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे हे कोर्टाचे म्हणणे आहे. निश्चितरुपाने समन्वय असला पाहिजे परंतु त्या पदावर बसलेला व्यक्ती संवैधानिक पदी असतो. त्यामुळे त्यांच्यावर राजकीय दबाव नसला पाहिजे. राज्यपाल हे राजकीय पक्षाचे व्यक्ती नाही याचे भान राज्यपालांनी ठेवावे.

राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार विधानपरिषदेवर १२ आमदारांची नावे निश्चित करून प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. मात्र, राज्यपालांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रस्तावाला आता ९ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यपाल आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तरी याकडे लक्ष देतील, असे वाटते.

Team Global News Marathi: