आता आदित्य ठाकरेंना झटका; युवा सेनेतील प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे गटात सामील

आता आदित्य ठाकरेंना झटका; युवा सेनेतील प्रमुख सहकारी एकनाथ शिंदे गटात सामील

पुणे :- एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाळी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतरही शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होत आहेत. अशातच आता आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेतही गळतीला सुरुवात झाली आहे.

शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात साळी सहभागी झाले असून प्रथमच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अधिकृत राजीनामा दिला. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला.

राज्यातील सत्तांतरानंतर शहरातील शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शहरातील काही माजी नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला आहे. मात्र अद्याप त्याबाबतची अधिकृत घोषणा त्यांच्याकडून करण्यात आलेली नाही. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले असताना शिवसेनेजे माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवा सेना सहसचिव किरण साळी यांनी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह त्यांची भेट घेतली होती. त्याच वेळी हे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले होते. या भेटीनंतर किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला.

१७ वर्षांत गटप्रमुख ते युवा सेना सहसचिव या पदावर काम करताना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान दिले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी माझी निष्ठा आहे. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेना माझी आहे. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिलेदारांना बळ देणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरण साळी यांनी दिले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: