दहावीची परीक्षा नाहीच; पण जूनमध्येच ‘या’ गुणांच्या आधारे लागणार रिझल्ट

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार याविषयी निर्माण झालेला तिढा आता सुटला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्याविषयीचे धोरण तसेच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया याबाबतची घोषणा केली. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन होणार असून त्यासाठी नववी, दहावीतील प्रत्येकी 50 गुण ग्राह्य धरले जातील. अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक प्रश्नांवर आधारित सीईटी होणार आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनाच अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. दरम्यान, 10वी संदर्भात म्हणणे मांडण्यासाठी राज्य सरकारने आज उच्च न्यायालयाकडे दोन आठवडय़ांचा अवधी मागितला.

दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 1 जून रोजी पुढील सुनावणी होणार असून त्याअनुषंगाने आज शालेय शिक्षण विभागाने दहावीचे अंतर्गत मूल्यमापन आणि अकरावी प्रवेश याविषयीचे शासन निर्णय जारी केले. राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर कायम असून दहावीचा निकाल कसा जाहीर करणार, अकरावी प्रवेश कसे होणार याविषयी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्यासोबत सुमारे 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन सीईटी

सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशात समान संधी मिळावी यासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ऐच्छिक असेल. सदर परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून विद्यार्थ्यांना 100 गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील तसेच ओएमआर पद्धतीने दोन 2तासांची परीक्षा घेण्यात येईल.

सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांना दहावीच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

तर परीक्षेची संधी

अंतर्गत मूल्यमापनाआधारे तयार केलेल्या निकालाने विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्यास अशा विद्यार्थ्यांना कोरोनाची परीस्थिती सामान्य झाल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुढील दोन परीक्षांना बसण्याची संधी मिळणार आहे.

असे होईल मूल्यांकन प्रत्येक विषयाचे 100

गुणांचे अंतर्गत मूल्यमापन

दहावीचे अंतर्गत लेखी मूल्यमापन

30 गुण

गृहपाठ, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा

20 गुण

नववी विषयनिहाय अंतिम निकाल

50 गुण

दहावीचे पुनर्परीक्षार्थी (रिपीटर), खासगी (फॉर्म – 17), तुरळक विषय घेऊन बसणाऱया विद्यार्थ्यांसाठीहीमूल्यमापन धोरण निश्चित केले आहे

श्रेणीसुधार योजने अंतर्गत परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनात्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी कायमअसतील.

दहावीचा निकाल तयार करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समितीकाम करणार आहे

निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीयस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱयांकडून करण्यात येईल.

शाळास्तरावर निकालात गैरप्रकार अथवा अभिलेखयामध्ये फेरफार झाल्यास शाळांचे निकाल रोखून धरणेशिस्तभंग  दंडात्मक कारवाईबरोबरच शाळेची मान्यताकाढून घेण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

राज्य मंडळामार्फत जून अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्याचे नियोजन असून त्यासाठी विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचे वेळापत्रक शिक्षण मंडळामार्फत लवकरच जाहीर होणार आहे.

या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करणे शाळांना बंधनकारक असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठीचे प्रशिक्षणही शाळांना दिले जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: