अल्टिमेटम द्यायचा नाही, ही हुकुमशाही चालणार नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले  –

अल्टिमेटम द्यायचा नाही, ही हुकुमशाही चालणार नाही; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले  –

 

मुंबई : मनसेने (MNS) घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात भोंग्यांवरून राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम महाविकास आघाडी सरकारला दिला होता. दिलेल्या अल्टिमेटमवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी पत्रकार परिषद घेत राज ठाकरेंना खडे बोल सुनावले. तसेच भोंग्यांबद्दल राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ( Ajit Pawar told Raj Thackeray)

अजित पवार म्हणाले, आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार मानले जातात. आपण रोज त्यांच्या विचारांचे स्मरण करत असतो. परंतु त्यांच्या विचारांचे  स्मरण करताना राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. राज्यातील धार्मिक स्थळांनी भोंगे वापरण्याबद्दल परवानगी घ्यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची बंधने पाळावी, कोणीही लाऊडस्पीकरचा आवाज वाढवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ज्यांनी भोंगे वापरण्यासाठी परवानगी घेतली नाही, त्यांनी ती घ्यावी. कोणाच्याही दबावाला आणि भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भोंगे वापरण्यासाठी परवानगी न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. परंतु परवानगी लगेच एक-दोन दिवसांमध्ये भेटू शकणार नाही, त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ देण्यात येईल. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांना पाळावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा एका विशेष समुदायासाठी नाही. त्यामुळे तो आदेश फक्त एका समुदायाने नाही, तर सर्व धर्मांनी पाळणे आवश्यक आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांना काही अटी घालून देत औरंगाबादच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या अटींचे उल्लंघन झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबद्दल पोलीस त्यांचं काम करत आहेत. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नये, तसेच अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा दिला. अल्टिमेटमची भाषा कुणी करु नये. कायद्याने हे सरकार चालते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत असेही अजित पवार म्हणाले.

अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे योग्य नाही. जो काही निर्णय करायचा ठरला तर सर्वांना बंधनकारक आहे. वेगवेगळ्या धर्माला नियम लागू होईल असे सांगतानाच अजित पवार यांनी उत्तरप्रदेशमध्ये जे घडलं त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने २००५ मध्ये निर्णय दिला होता त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील जहांगिरपुरी येथे झालेल्या दंगलीनंतर युपीमध्ये योगी सरकारने गोरखपूरमध्ये गोरखमठावरील भोंगे उतरवले. त्यानंतर राज्यातील इतर काही ठिकाणी आवाहन केल्यानंतर मंदिर आणि मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले. तिथे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, असेही अजित पवार म्हणाले.

‘मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे,’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री कुठल्या जातीचा व्हावा हा प्रश्न नाही उद्या तृतीयपंथीसुध्दा मुख्यमंत्री होऊ शकतो. १४५चं बहुमत आणा आणि व्हा मुख्यमंत्री. कुणी अमुक जातीचा होईल या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: