‘उत्तर’ कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच, जयश्री जाधव महाविकास आघाडीच्या उमेदवार

 

कोल्हापुर | स्थानिक शिवसैनिकांचा रोष अंगावर ओढावून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठे मन दाखवित विधानसभेच्या कोल्हापूर उत्तरची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना पाठिंबा द्यायचे ठरविले आहे. जयश्री जाधव यांची उमेदवार म्हणून काँग्रेसकडून आज, शनिवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर येत्या रविवारी शिवसेनेसह महाविकास आघाडीचा एकत्रित मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे.

कोल्हापूर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उत्तर मतदार संघातून शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी द्यावी असा आग्रह स्थानिक शिवसैनिकांनी धरला होता. त्यावेळी संपर्क मंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रमुख यांच्या कानावर आपल्या भावना घालू असे सांगितले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधून शिवसेना लढणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली होती.

शिवसैनिकांची आग्रही भूमिका लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले दोन दिवस बैठका सुरु होत्या. त्यानंतर गुरुवारी पुन्हा उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक झाली, या बैठकीस सामंत, क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते. तर पालकमंत्री सतेज पाटील, उपस्थित होते. बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात न उतरविता महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांना पाठिंबा देण्याचे ठरले

Team Global News Marathi: