‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

 

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा मारला.

राज ठाकरे म्हणाले की, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निव़डणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: