मुंबई : मागच्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याची तुलना होताना दिसून येत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रधानमंत्री पदासाठी नितीन गडकरी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे बोलून दाखविले होते. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे असे सुद्धा त्यांनी सुचविले होते.
दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले आहे. नितीन गडकरींबाबत भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करतात. मी लेखाच्या माध्यमातून तसेच ट्विटरवरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र याचा अर्थ मी त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो, असा होत नाही. नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती आहेत, असे खोचक कौतुकही अशोक चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या कारकीर्दीची ७ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. दरम्यान, गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. त्यातच देशात दुसरी लाट आल्यानंतर कोरोनाबाबतचे सरकारचे नियोजन फसल्याची टीका केली जात आहे. तसेच देशावरील कोरोनाचे संकट आणि लसीकरणाचे धोरण फसल्याने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यात येत आहे.