नितेश राणेंचे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान; मुंबईत राडा होण्याची शक्यता

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच नगरसेवक अमेय घोले यांनी थेट दादर येथे नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख केलेला बॅनर लगावला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.

माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तर नाशिकमध्ये पोलिसांच्या सायबर सेलकडून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Team Global News Marathi: