शिवसेना आक्रमक | नारायण राणेंविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल होण्याची मालिका

 

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने चांगलेच अडचणीत आणले आहे. नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवर नारायण राणे च्याविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महाड, रायगड, नाशिक आणि पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यातही शिवसेना आमदार अंबादास दानवे नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यातील आणखी काही शहरांमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन शिवसैनिकांकडून त्यांची कोंडी केली जाऊ शकते.

नारायण राणे यांच्याविरोधात दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मुख्यत्वेकरुन मुख्यमंत्र्यांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे आणि शत्रुभाव निर्माण करण्यासाठीच्या कलमांचा समावेश आहे. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम ५००, ५०५ (२), १५३-ब (१) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाडमध्ये भादंवि कलम १५३, १८९, ५०४, ५०५ (२) आणि ५०६ प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Team Global News Marathi: