मुंबई | एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पण, आता दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. दीपक केसकरांनी आरोप केल्यानंतर माघार घेतली पण आता निलेश राणेंनी केसरकरांना थेट ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर देऊन डिवचले आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजपमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजपचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. नारायण राणेंनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बदनामी केली. त्याबद्दल आपण त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती, असं विधान केसरकरांनी केलं होतं. पण, यावरून भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटले. आता निलेश राणे यांनी थेट केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे.
‘दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे’ असं म्हणत निलेश राणेंनी एकेरी उल्लेख करत केसरकरांवर टीकास्त्र सोडले आहे. विशेष म्हणजे, या वादावर पडदा टाकत दीपक केसरकर यांनी माघार घेतली.