शरद पवार यांच्याबद्दल नव्या पिढीने तारतम्य बाळगून बोलावे, अजित पवार यांनी फडणवीसांना फटकारले

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची उंची व देशपातळीवरील काम पाहून त्यांच्याबद्दल नव्या पिढीने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज फटकारले.

गोवा, उत्तर प्रदेशसह देशातल्या पाच राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गल्लीतला पक्ष आहे, या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते व गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

यावर पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा जोरदार शब्दांत समाचार घेतला. कोणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करीत तिथपर्यंत पोहोचलेला असतो. राजकारणाबद्दल खूप काही बोलता येईल, पण महाराष्ट्रापुरते जे काही असेल ते मला विचारा. त्याची सडेतोड उत्तरे देईन. पण देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

राजकीय जीवनात मला 30 वर्षे झाली. मला बारामतीकरांनी खासदार म्हणून निवडून दिले होते, पण सहा महिन्यांत मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावे लागले आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे. माझे  काम चाललेले आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: