नेते ‘नियोजन’ला.. मात्र कार्यकर्ते पोस्टर लावायला, कोल्हापुरात भाजपमध्ये संतापाची भावना

 

जिल्हा नियोजन समितीवर भाजपकडून नेत्यांनाच संधी दिली गेल्याने महानगर आणि ग्रामीणचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.शुक्रवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या दोन स्वतंत्र बैठकीमध्ये याचे पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच थेट जाब विचारला. मात्र, उत्तरे देताना नेत्यांची कुचंबणा झाली. नेते सारे ‘नियोजन’ला.. आणि कार्यकर्ते खळ पोस्टरला लावायला, काय अशी संतप्त विचारणा झाली.

गुरूवारी नियोजन समितीची नावे जाहीर झाली. यामध्ये भाजपचे सात सदस्य आहेत; परंतु त्यातील पाच जण नेते आहेत. ही नावे वाचल्यानंतर गुरुवारी रात्रीपासूनच भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. अशातच शुक्रवारी सकाळी १० वाजता ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वाजपेयी यांची जयंती, मन की बात आणि पक्षाच्या अन्य उपक्रमांबाबत चर्चा झाल्यानंतर अल्केश कांदळकर यांनी समिती निवडीच्या विषयाला तोंड फोडले.

पक्षाचे कार्यक्रम करण्याकरिता, मन की बात कार्यक्रमासाठी, सेवा सप्ताहासाठी तुम्हाला कार्यकर्ते पाहिजेत. मग या नेत्यांनाच घेऊन तुम्ही कार्यक्रम करा, असे स्पष्ट शब्दांत यावेळी नेत्यांना सुनावण्यात आले. पक्षाने दिलेल्या कार्यक्रमावेळी यातील कोणीही नसतात, आम्ही सामान्य कार्यकर्ते हे कार्यक्रम करतोय हे लक्षात घ्या, असेही बजावण्यात आले.

दुपारनंतर भाजपच्या बिंदू चौकातील शहर कार्यालयात बैठक झाली. याही बैठकीत गोंधळ झाला. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कोणत्या निकषावर तुम्ही नियोजन समितीचे सदस्य निवडले असा प्रश्न उपस्थित केला. विशेष कार्यकारी अधिकारी करताना निकष लावले, मग इथे कोणते लावले. बाहेरून आलेल्यांना पदे दिली गेली.

Team Global News Marathi: