नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी नाही; सुब्रह्मण्यम स्वामी यांची घणाघाती टीका

 

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत धक्कादायक विधान केले आहे. यासोबतच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक आहे, असे म्हणत त्यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला.

सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च आणि मशीदी ताब्यात घेतल्या नाहीत. मग हिंदूंनी कोणते पाप केले आहे? मोदी हिंदुत्ववादी नाहीत. त्यांनी उत्तराखंडमध्ये अनेक मंदिराचे सरकारीकरण केले. मी न्यायालयात जाऊन ती मुक्त करणार. मी भाजपच्या जाहीरनाम्यानुसार काम करणार, पंतप्रधान मोदी तसे नाहीत, असे म्हणत त्यांनी थेट मोदींवर टीका केली.

दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भाष्य केले व म्हणाले, महाराष्ट्रामधील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे, त्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तसेच, ३७० कलम हटवण्यासाठी मी अमित शहा यांना मार्गदर्शन केले आहे, असा दावाही त्यांनी केला. भाजपला त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने घरचा आहेर दिल्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Team Global News Marathi: