नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणी एनसीबीने सुरु केली चौकशी

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान याची केस पुन्हा उघडण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या एसआयटीने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान याच्या गुन्ह्यात दोन जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे मलिक यांच्या जावयाच्या अडचणी अधिक वाढणार आहे.

याप्रकरणी संदर्भात एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, जामीन अटींचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही मुंबई उच्च न्यायालयात समीर खान याचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत. त्यातच आता समीर खान गुन्ह्याप्रकरणी दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. मात्र यावर अद्याप मलिक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

समीर खान, सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि ब्रिटिश नागरिक करण सेजनानी यांच्यासह इतरांना एनसीबीने या वर्षी जानेवारीमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीने दावा केला होता की, आरोपींनी गांजा खरेदी, विक्री करण्याचा कट रचला होता. समीर खान याच्या संपर्कात असलेल्या सेजनानीकडून बहुतांश औषधे जप्त करण्यात आली आहेत. १७ सप्टेंबर रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाने समीर खान, फर्निचरवाला आणि सेजनानी यांना जामीन मंजूर केला होता.

समीर खान याच्या अटकेपासून मंत्री नवाब मलिक एनसीबीवर हल्लाबोल करत आहेत. नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे क्रूझ ड्रग चौकशीवर आमने-सामने आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्याने वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. मात्र, हे सगळे आरोप एनसीबी अधिकारी आणि केंद्रीय एजन्सीने फेटाळले आहेत.

Team Global News Marathi: