नवाब मालिकांचे जावई समीर खान यांच्या अडचणीत अजून भर, न्यायालयात अर्ज दाखल.

 

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर अनेक खुलासे आणि घडामोडी घडताना दिसत आहेत. या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे.तर एनसीबीकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरण , समीर खान प्रकरण व अन्य ४ प्रकरणांचा नव्याने तपास सुरू असून एनसीबीने आज एनडीपीएस न्यायालयात समीर खान प्रकरणाच्या अनुषंगाने एक अर्ज केला आहे. या अर्जावरून मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणामध्ये आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे व येथील अन्य अधिकाऱ्यांऐवजी दिल्लीतील अधिकाऱ्यांची एसआयटी तपास करीत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची नव्याने पडताळणी सुरू झालीय. त्याचबरोबर समीर खान आणि इतर २ जणांच्या आवाजाचे नमुने एसआयटीला घ्यायचे आहेत. त्यासाठी एनसीबीकडून आज विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. ही परवानगी मिळाल्यास तिघांचेही आवाजाचे नमुने घेऊन आगामी तपास सुरू करण्यात येणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात समीर खान आणि ब्रिटिश नागरिक करन सजनानी या दोघांना यंदा जानेवारी महिन्यात अटक केली होती. दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा दावा होता. त्यातील एकूण १८ सँपल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ११ सँपलचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. एनसीबीच्या तपासात समीर खान आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉइस चॅटची तपासणी करण्यात आली होती. काही आवाजाचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती.

Team Global News Marathi: