राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काळ जळगावात एका रक्तदान शिबिराला भेट देत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. ‘देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत’ अशा शब्दात खडसे यांनी फडणवीसांना टोला लगावला होता.
या टीकेला आता भाजप आमदार राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर देत खडसेंवर गंभीर आरोप लावले आहेत. ‘नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केलं नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, असा घणाघात राम सातपुते यांनी केला आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून माशासारखे तडफडत आहेत. ते ब्राम्हण असले तरी त्यांची सरकार पडणार असल्याची भाकिते खरे ठरतं नाही. सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं त्यांना रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती या टीकेला आमदार राम सातपुते यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. यावर आता राष्ट्रवादी काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.