नाशिकमधील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण होणार, दुर्घटनेबाबत एकनाथ शिंदे यांचे चौकशीचे आदेश

 

नाशिकची बस दुर्घटना अतिशय मोठी घटना असून जखमींवर सर्वोतोपरी उपचार करण्यात येतील, शिवाय या घटनेत बारा जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये, याची देखील दखल शासनाने घेतलेली आहे. घटनास्थळाची पाहणी केली असून याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील औरंगाबाद रोडजवळील मिरची हॉटेल परिसरात बसचा भीषण अपघात झाला. ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांत अपघात होऊन ट्रॅव्हल बसला भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने अनेकांना मृत्यूने गाठलं. काही वेळेतच ही बस जळून खाक झाली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाला सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश देऊन ते नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींची विचारपूस केली. तसेच उपस्थित मृतांच्या नातेवाईकांना आधार देत मदत जाहीर केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, बस अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल शासनाने घेतलेली आहे. घटनास्थळावरील ब्लॅक स्पॉट पाहणी केली असून यामध्ये कुणाची चूक आहे, याबाबत चौकशी केली जाईल. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: