मंत्री नारायण राणे यांनी कोकणात एका जाहीर कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचा इशारा दिला. त्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना राणेंवर पलटवार केला. राणेंनी माझ्या नादाला लागू नये, अन्यथा तुमची जुनी प्रकरणे बाहेर काढून तुम्हालाच ५० वर्षांसाठी जेलमध्ये पाठवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर दुपारी याच मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत चांगलेच भडकलेले दिसले. मी आजपर्यंत शांत होतो, पण आता तुमच्या बोगस कंपन्यांचे प्रकरण बाहेर काढतो आणि तुम्हाला तुरुंगात पाठवतो, अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर आज शिवडी कोर्टात सुनावणी पार पडली. मात्र वारंवार गैरहजर राहिल्याने शिवडी न्यायालयाने संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता राऊत म्हणाले, काही जणांना अजामीनपात्र वॉरंट काढलं यामध्ये फार मोठी गोष्ट वाटते. आम्ही न्यायालयासमोर हजर राहू शकलो नाही, याचा मलाही खेद आहे. मी आमच्या वकीलाला सांगितलं आहे, की ताबडतोब न्यायालयात जाऊन विनंती करा की उच्च न्यायालयात एक विषय होता. तिथून मला इथे येण्यास खूप वाहतूक कोंडी असल्याने मी पोहचू शकलो नाही.
दरम्यान याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांबाबत प्रश्न विचारला. मात्र यावेळी त्यांनी राणेंचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिले. कोण नारायण? असा प्रश्न उपस्थित करत राणेने एकदा पुन्हा अग्रलेखाचे वाचन करावे. मी परत एकदा सांगतो, राणे माझ्या नादाला लागू नको. मी आजपर्यंत शांत होतो. पण आता राणेच्या बोगस कंपन्यांचे सर्व प्रकरणे बाहेर काढतो.
कालपर्यंत मी त्याचे नाव आदराने घेत होतो. पण त्याने आरेतुरेची भाषा वापरली. सगळ्यांना आरे तुरे करतो. मुख्यमंत्र्यांना आरेतुरे… मोदींना आरेतुरे.. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, फडणवीस, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांना आरे तुरे करतो. किरीट सोमय्या यांनी नारायण राणेंवर जे आरोप केले, ते उत्तर दिले का? १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळी प्रकरणे बाहेर काढतो. असे ५६ राणे मी बघितले आहेत. हा काय लागला माझ्यापुढे. नारायण राणे नामर्द माणूस आहेस. ईडी आणि सीबीआयच्या भीतेने पळाला आहे. तो वेड्यांच्या कळपात आहे. शिंदे गटाच्या माणसाला केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी राणेचे मंत्रिपद जातं आहे म्हणून तो भैसाटलाय. तो बोलत राहिला तर पूर्ण नागडा करीन. तू ये. मैदानात… हिंमत आहे तर फिर एकटा. केंद्राची सुरक्षा काढून टाक आणि ये मैदानात, असा इशारा राऊत यांनी दिला.