नारायण राणेंची तब्येत बिघडली बीपी वाढला ; वैद्यकीय तपासणीसाठी पथक रवाना

मुंबई- सुरु असलेल्या गोंधळादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पथक रवाना झाल्याची माहिती आहे. तब्येत अधिक बिघडल्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी अॅम्बुलन्स सुद्धा बोलावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख आयोजक जठार यांनीही राणेंची तब्येत बिघडली असल्याचं सांगितलं आहे. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. राणेंना त्यांच्यात गाडीत बसवून पोलीस हायवेकडे रवाना झाले आहेत.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले असून त्यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणेंना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. राणे यांच्याकडून मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. पण, कोर्टाने यावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

नारायण राणेंच्या विरोधात नाशिक, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर राणेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. एफआयआर रद्द करावी आणि अटकेपासून संरक्षण द्यावे अशी फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. राणे यांच्यावतीने अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. मात्र, पुरेशी कागदपत्र नसल्याने उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीस नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत राणेंना अटक केली. नारायण राणे हे मोदींच्या कॅबिनेटमधील अटक होणारे पहिले मंत्री आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: