रायण राणे यांची अटक म्हणजे घटनेची पायमल्ली – जगतप्रकाश नड्डा

दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक म्हणजे घटनात्मक मुल्यांची पायमल्ली आहे. मात्र, अशा कोणत्याही कारवाईस भाजप घाबरणार नसून जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार आहे, असे ट्विट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केले आहे.

केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याविषयी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ट्विट केले. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक म्हणजे घटनात्मक मूल्यांचे हनन आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणत्याही कारवाईस भाजप घाबरणार नाही आणि दबणारही नाही.

भाजपला जनआशीर्वाद यात्रांमध्ये मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून हे लोक घाबरले आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीने लढा देत राहणार असून जनआशीर्वाद यात्राही सुरूच राहणार असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे.

कदाचित जे बोलू नये ते वक्तव्य नारायण राणे यांनी केले असेल. मात्र, त्यावरून त्यांच्याविरोधात ३० ते ४० गुन्हे नोंदविणे आणि त्यांना अटक करणे ही लोकशाहीची हत्या आहे. दरमहा १०० कोटी वसुली करणारे अनिल देशमुख आणि हिंदूविरोधी वक्तव्य करणारा सरजिल उस्मानी यांना अटक करण्याची हिंमत ठाकरे सरकार दाखविणार का, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत केला.

ते पुढे म्हणाले, राज्य सरकारमधील तब्बल २७ मंत्र्यांवर विविध गुन्हे आहेत. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय राऊत दररोज ज्या प्रकारची वक्तव्ये करीत असतात, ते तर अतिशय लाजिरवाणे असते. मात्र, त्याविरोधात कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नसल्याचेही पात्रा यांनी नमूद केले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: