नारायण राणेंना मंत्रिपद दिलं, आता राणेंनी उद्योगांना संजीवनी द्यावी – संजय राऊत

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात भाजपा नेते आणि माजी उख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच नियुक्तीवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. पण त्यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा आहेत. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चालला आहे… बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. मोदींनी पत्ते पिसले आहेत ते बरोबर आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदं आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा मोहरा पडला आहे. अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडलेला आहे. नक्कीच नारायण राणेंना मंत्री केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग असं खातं त्यांना दिलं. राणेंची उंची मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. अनेक पदं सांभाळली आहेत, असं सांगतानाच राणेंपुढे रोजगार वाढवण्याचं मोठं काम किंवा आव्हान आहे, असं राऊत म्हणाले.

Team Global News Marathi: