मुंबई विमानतळावर तब्बल 61 किलो सोने हस्तगत, सीमा शुल्क विभागा ची मोठी कारवाई

 

मुंबई | मुंबई विमानतळावर जणू घबाडच सापडले. सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने एकाच दिवसात तब्बल 61 किलो सोने हस्तगत केले असून आजवरची ही ऐतिहासिक कामगिरी मानली जाते. जप्त सोन्याची बाजारातील किंमत 32 कोटी एवढी आहे. या सोने तस्करीप्रकरणी गुप्तचर विभागाने पाच पुरुष आणि दोन महिला प्रवाशांना अटक केली आहे. विमानतळांवरील सोने वा इतर वस्तूंची तस्करी रोखण्यासाठी हवाई गुप्तचर विभागाने ‘ऑपरेशन परछाई’ ही मोहीम सुरू केली आहे.

गेल्याच आठवडय़ात एआययूने मोठय़ा प्रमाणात परदेशी चलन जप्त केले होते. त्या कारवाईनंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी होऊ शकते असा एआययूने अंदाज बांधला. एआययूचे उपायुक्त मनुदेव जैन यांच्या पथकाने शुक्रवारी ऑपरेशन परछाई हाती घेतले. एआययूच्या अधिकाऱ्याने विमानतळावर फिल्डिंग लावली. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कसून तपासणी केली.

शुक्रवारी टांझानिया येथून तीन प्रवासी विमानतळावर आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांची कसून तपासणी केली. त्या प्रवाशांच्या कमरेला विशिष्ट प्रकारचा एक पट्टा बांधला होता. त्या पट्टय़ामध्ये सोने लपवले होते. त्यानंतर दोन प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनदेखील सोने जप्त केले. पॅरिअर असलेला एक प्रवासी हा तस्करीमधील सूत्रधार असून त्या तिघांना सोने तस्करीमध्ये प्रत्येकी 50 हजार रुपये मिळणार होते. दोहा येथील सुदान देशाच्या एका नागरिकाने ते सोने त्या तिघांना दिले होते. तो तस्कर त्या तिघांसोबत मुंबईत येत नव्हता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Team Global News Marathi: