मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर रात्रीच्या प्रवासावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावर वारंवार होणार्‍या अपघातात अनेक विविध क्षेत्रातील होतकरू व्यक्तींचा हकनाक जीव गेला आहे. या एक्सप्रेस हायवेवर वेगाचे बंधन कोणीच पाळत नाही. तसेच अवजड वाहतूकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रात्रीच्या प्रवासावर बंधने टाकावीत अशी मागणी पुढे येत आहे.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा जेथे अपघाती मृत्यू झाला त्याच मार्गावर मराठीच्या दिग्गज अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे या एक्सप्रेसच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्याच्या काळात पैसा मिळविण्यासाठी डबल ड्यूटी केली जाते. या ड्रायव्हरना पुरेशी झोप मिळालेली नसते.

तसेच पहाटेची एक डुलकी ड्रायव्हरचे लक्ष विचलीत करू शकते. इतके काय महत्वाचे काम असते की जीवावर उदार होऊन मध्यरात्री प्रवास करण्याची गरज लागते. ट्रॅफिकमुळे वाया गेलेले दीड दोन तास नंतर कव्हर करण्याचा नादात माणसांचा जीव जातो. ही काही मालवाहतूक नाही, त्यामुळे रात्रीच्या प्रवासावर बंदी टाकावी अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीच्या व्हाईस चेअरमन अनुराधा देशपांडे यांनी केली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मोठा असल्याने भल्याभल्यांना ओव्हर टेकचा मोह होतो. अनेकदा अवजड वाहनांचे मागचे रिफलेक्टर बंद पडलेले असतात. वळण घेताना अवडज वाहनांच्या मोठ्या आकारामुळे मागच्याला पुढे काय वाढून ठेवले आहे याचे भान नसते. अवजड चालकांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने लेनची शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे वेळ वाचविण्याच्या नादात लाखमोलाचा जीव हकनाक जातो असेही अनुराधा देशपांडे यांनी सांगितले.

एक्सप्रेस हायवेवर अनेक ठिकाणी अनियंत्रित उतार, टोकदार वळणे या त्रुटींसह वाहतूक यंत्रणेच्या दुलर्क्षामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. या मार्गावर गेल्या जानेवारी ते एप्रिल दरम्यानच्या कालावधीत एकूण 14 अपघात झाले. यातील 9 अपघातात जीवितहानी झाली आहे. नियमित होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबईचा प्रवास हा अनेकांना नकोसा झाला आहे.

 

 

Team Global News Marathi: