मुंबई, पुण्यासह कोकणाला ‘यलो अलर्ट’

 

मुंबई | गणेशाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, आज आणि उद्या यलो अलर्ट, तर १३-१४ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मागील एका आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून, पुढील काही दिवस पाऊस आणखी जोर धरणार आहे. भारतीय हवामान विभागाने १४ सप्टेंबरपर्यंतचा हवामानाच अंदाज वर्तवला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, याचा परिणाम राज्यात दिसून येणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आज रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: