ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मुंबई महापालिकेकडूनच दुर्लक्ष, मोजावी लागते मुंबईकरांना किंमत !

मुंबई : राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन अभावी अनेक कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर आता एका धक्कदायक माहिती समोर येत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून ऑक्सिजन प्लांट उभारायला मुंबई महापालिकेकडूनच दुर्लक्ष झाल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये मोठया प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हजारो रुग्णाचे नातेवाईक तक्रारी करत आहेत. मुंबईतील बोरिवलीमधील भगवती रुग्णालय आणि गोवंडीतील पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांना चक्क कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे; पण मुंबई महापालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याचा प्रस्तावाच्या फाईलवर आरोग्य विभागाचे अधिकारी अडून राहिले आहेत.

मागच्या वर्षभरापासून सर्व उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवण्याची मागणी होत आहे; पण याकडे आरोग्य विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. या अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे दोन उपनगरीय रुग्णालयांमधील रुग्णांना ऑक्सिजनअभावी अन्य कोविड केंद्रात हलवण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगर पालिकेचे धिंडवडे निघत आहे.

Team Global News Marathi: