मुंबई मनपाचा १२ सूत्री कार्यक्रम जाहीर, आयुक्त चहल यांची ३ तास मॅरेथॉन बैठक

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार बरोबर मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपाचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी मॅरेथॉन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत १२ सूत्री कार्यक्रम जाहीर करून कोरोनाला रोखण्यासाठी मनपा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे,

सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोना संशयितांची वैद्यकीय तपासणी, तपासणी अहवाल, लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे व्यवस्थापन, रुग्णालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थापन, विलगीकरण विषयक बाबी, जम्बो कोविड सेंटर, वॉर्ड वॉर रुम, सील्ड इमारती इत्यादी कोरोना संसर्गाशी संबंधित विविध विषयांवर कोविड नियंत्रणाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

कोरोना नियंत्रणासाठीचा बीएमसीचा १२ सूत्री कार्यक्रम

१) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या व्यक्तिंना कोविड संबंधी लक्षणे आहेत, त्यांनी आपली वैद्यकीय चाचणी निर्धारित केलेल्या ठिकाणी अगर खासगी वैद्यकीय प्रयोग शाळांकडून करून घ्यायची आहे.

२) कोरोना बाधितांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे प्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळविणे बंधनकारक आहे.

३) बाधित रुग्णांच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल हे चाचणी केल्यापासून २४ तासांच्या आत बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळविणे तसेच संबंधित साईडवर अपलोड करणे बंधनाकार आहे.

४) कोविड खाटांची संभाव्य गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन तातडीने व सुव्यवस्थितप्रकारे करावे.

५) ज्या व्यक्तिंना कोरोनाची लक्षणे असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु, ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे गृह किंवा संस्थात्मक विलगीकरण तात्काळ करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन अशा रुग्णांपासून इतरांना कोविड बाधा होणार नाही.

६ ) गृह विलगीकरणात असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या हातावर विलगीकरणाचे ठसे उमटविणे बंधनकारक आहे. असे रुग्ण सार्वजनिक परिसरात किंवा घराच्याबाहेर वावरताना आढळल्यास त्यांच्याविरोधात ‘एफआयआर’ दाखल करावा.

७) गृह विलगीकरणात असलेले व लक्षणे नसलेले रुग्ण हे घरातच असल्याची खातरजमा करण्यासाठी ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे दररोज ४ वेळा रुग्णांना दूरध्वनी करावेत व त्यांना घरातच राहण्याविषयी पुन्हा-पुन्हा सूचना द्यावी. या अनुषंगाने रुग्णाच्या घरी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास त्यावर प्राधान्याने संपर्क साधावा.

८) कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाची कार्यवाही ही महापालिकेच्या संबंधित विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारेच करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांनी आपापल्या रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेची माहिती ही नियमितपणे ‘वॉर्ड वॉर रुम’कडे कळवावयाची आहे. जेणेकरुन, ‘वॉर्ड वॉर रुम’च्या स्तरावर खाटांचे व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होईल.

९ ) महापालिका क्षेत्रातील इमारतींच्या पदाधिका-यांना कोरोना विषयक व्यवस्थापनात सहभागी करुन घ्यावे. यामध्ये प्रामुख्याने विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंचे अधिकाधिक प्रभावी विलगीकरण साध्य करणे, विलगीकरणात असलेल्या व्यक्तिंना व कुटुंबियांच्या दैनंदिन गरजांबाबत व्यवस्थापन करणे आदी बाबींचा समावेश करता येईल.

१०) ज्या इमारतींमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील कराव्यात.

११) विवाह सोहळे, जिमखाना/क्लब, नाईट क्लब, उपहारगृहे, चित्रपट गृह, सर्व धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, खासगी कार्यालये आदी सर्व ठिकाणी मास्कचा वापर प्रत्येकाने करणे बंधनकारक आहे. विवाह सोहळा, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्ती सहभागी होण्यास परवानगी आहे.

१२) कोरोना संबंधित काही प्रलंबित बाबी असल्यास त्या याच आठवड्यात मार्गी लावाव्यात, असेही आदेश आजच्या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व संबंधितांना दिले.

Team Global News Marathi: