मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदिवसीय रत्नागिरी दौऱ्यावर; दिवसभर भरगच्च कार्यक्रम

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवसाच्या रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख आहे. दरम्यान,राज्यात झालेल्या सत्तातरानंतर आणि शिवसेनेतील मोठ्या राजकीय बंडानंतर, फुटीनंतर होत असलेला दौरा महत्त्वाचा आहे. सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री मुंबईहून शासकीय हेलिकॉप्टरने रत्नागिरीला रवाना होती आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत रत्नागिरी विमानतळावर पोहोचतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून दिवसभर त्यांचा भरगच्च असा कार्यक्रम देखील आहे. आपल्या दौऱ्याची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. रत्नागिरीतील एकदिवसीय दौऱ्यात मुख्यमंत्री विविध पदाधिकारी, संघटनेसोबत चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील कोट्यवधी कोटींच्या विविध विकासकामांचं भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळी प्रमोद महाजन संकुलमध्ये सभा होणार आहे. त्यानंतर रात्री ते मुंबईच्या दिशेने रवाना होतील.

यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारे काही समर्थक आणि सध्या प्रस्तावित असलेल्या बारसू-सोलगाव इथले रिफायनरी विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री या लोकांना भेटणार का? तसेच कोकणातील रिफायनरीबाबत मुख्यमंत्री काही भाष्य करणार का? याकडे देखील सर्वांचे कान आणि डोळे लागून असणार आहेत.

Team Global News Marathi: