मुख्यमंत्री आपल्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे; संजय राऊतांचा जोरदार टोला

 

सी-व्होटरच्या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा सर्व्हे फेटाळून लावला आहे. महाविकास आघाडीच्या चार-पाच जागा निवडून आल्या तरी पुरे. ज्यांना सर्व्हेमुळे हर्षवायू झाला असेल त्यांना मी काहीही म्हणणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडीची खिल्ली उडवली आहे.

आता यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शिंदे यांना जशासतसे उत्तर दिलं आहे. तुम्ही तुमच्या मुलाचा जागा वाचवली तरी पुरे, असे आव्हानच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. महाविकास आघाडीने चार-पाच जागा मिळवल्या तरी पुरे. माझे एकच सांगणे आहे. त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा वाचवली तरी पुरे. जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात तेव्हा त्यांना हवे असतात.

राष्ट्रीय स्तरावरचा सर्व्हे भाजपच्या बाजूने आहे. पण महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्या विरोधातील आहे. तो त्यांना नको. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला साधारण ३४ जागा मिळतील असा अंदाज आहे. पण आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

वंचित आघाडीचा महाविकास आघाडीत जाण्याबाबतचा प्रस्ताव आला नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार खरे सांगत आहेत. वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीचा घटक पक्ष झालेला नाही. चर्चा फक्त वंचित आणि शिवसेनेसोबतच झाली आहे, असे ते म्हणाले.

Team Global News Marathi: