मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ चा समारोप

 

आज आषाढी वारी वारीनिमित्त लाखो वारकऱ्यांचा मेळा चंद्रभागेच्या तिरावर भरला आहे. सगळेजण विठुरायाच्या गरजात तल्लीन झाले आहेत. दरम्यान, या आषाढी वारीनिमित्त पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ हा उपक्रम चालवला होता. या उपक्रमाचा समारोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करुया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप झाला. या समारोपानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रा. तानाजी सावंत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरण बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाण्यातील महाराष्ट्र कला संस्कृती मंच या सेवाभावी सांस्कृतिक संस्थेच्या सहकार्याने गेली बारा वर्षे राज्यातील जनतेला पर्यावरण जागृतीचा संदेश या वारीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Team Global News Marathi: