“मी मुंबईला होतो पण…”, नारायण राणे वडीलांच्या आठवणीनं झाले भावूक

 

आमदार नितेश राणे हे शेती करत असतानाचा नवा लूक दोन दिवसांपूर्वी सर्वांसमोर आला. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या शेतातील आठवणी सावंतवाडीतील पत्रकारांसमोर जागवल्या.राणे म्हणाले, आपल्याला वडिल आजारी असल्याचे पत्र आले की तरवा लावणीसाठी गावी याव लागायचं. हे सांगताना राणे चांगलेच भावनिक झालेले दिसून आले. आमदार नितेश राणे हे कणकवली तालुक्यातील वरवडे या मूळ गावी शेती करताना दिसून आले. हा त्यांचा नवा शेतकरी लूक प्रथमच महाराष्ट्रा समोर आला. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांसमोर वेगवेगळ्या विषयांवर आपली भुमिका मांडली. त्यावेळी त्यांना आमदार नितेश राणे हे शेती करताना दिसल्याबाबत विचारले असता त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र त्यांना आवड आहे, म्हणून ते शेतात गेले, असे सांगत नीतेश राणे यांचे कौतुक केले. पण नंतर मात्र आपण शेतात जात होता का? असे विचारताच राणे थोडे भावनिक झाले. त्यांनी आपल्या आठवणीच जागवल्या.

मी अठरा वर्षांचा असताना कामानिमित्त मुंबईला होतो. पण वडिल आजारी असले, की पत्र यायचे मग मुंबईतून कणकवली तालुक्यातील वरवडे या आपल्या गावी यायचो. त्यावेळी नांगरणीसह भात लावणीच्या कामात आपण मदत करायचो. शेतीच्या सगळ्याच कामांना मदत करत होतो. आता शेतीत जाणे होत नाही. राणेंच्या या बोलण्यातून त्यांची भावनिकता दिसून आली.

Team Global News Marathi: