गुडीपाडवा दिनी शिवतीर्थावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजाण संदर्भात केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले होते अशातच या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून सुद्धा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यातच आता याच पडसाद मुब्र्यात सुद्धा दिसून आले होते. ठाण्यातील मुंब्रा परिसरात काल मध्यरात्री १२ च्या सुमारास काही अज्ञातांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयावर दगडफेक केली.
यावेळी कार्यालयात कोणीही नसल्याने दगडफेकीत कोणालाही दुखापत झाली नाही. पण पक्ष कार्यालयाच्या बाहेर लागलेल्या बॅनरचं नुकसान झालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप मनसेने केला आहे. दरम्यान संबंध घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मनसे वाहतूक सेनेचे कळवा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इथल्या पदाधिकाऱ्याने म्हटलं होतं की मनसे सोडून राष्ट्रवादीत या, असं केलं नाही तर कार्यालयाची तोडफोड करु. मी त्यांचं ऐकलं नाही तर त्यावेळी स्थानिक पोलीस म्हणजेच मुंब्रा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.यानंतर पोलिसांनी कार्यालयाबाहेर बंदोबस्त लावला होता. पोलीस होते तेव्हा कोणी आलं नाही परंतु पोलिसांचा बंदोबस्त हटताच ते लोक आले आणि त्यांनी दगडफेक केली,” असा आरोप इरफान सय्यद यांनी केला.