“मिस्टर ३६०” एबी डिविलियर्सने घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्ती

 

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. ३७ वर्षीय डिविलियर्सने निवृत्ती घेतानाचा निर्णय जाहीर करताना भावुक पोस्ट लिहिली आहे.

त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये.’

त्याने पुढे म्हटले, ‘शेवटी, मला जाणीव आहे की माझ्या कुटुंबाने, माझे पालक, माझे भाऊ, माझी पत्नी डॅनियल आणि माझ्या मुलांनी त्याग केल्याशिवाय काहीही शक्य झाले नसते. आता मी आमच्या आयुष्यातील पुढच्या अध्यायाची वाट पाहात आहे, आता आम्ही त्याला प्राधान्ये देऊ शकू.’

याबरोबरच डिविलियर्सने सर्वांचे आभार मानताना लिहिले, ‘मी माझ्या प्रत्येक संघसहकाऱ्याचे, प्रतिस्पर्ध्याचे, प्रशिक्षकाचे आणि प्रत्येक फिजिओ आणि सपोर्ट स्टाफ सदस्याचे आभार मानतो. त्यांनी माझ्याबरोबर त्याच मार्गाचा प्रवास केलाय. दक्षिण आफ्रिकेत, भारतात, मी जिथे जिथे खेळलो तिथे मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी नम्रता व्यक्त करतो.’

Team Global News Marathi: