भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या बरोबर झालेल्या भेटीवर खासदार संजय राऊत यांचे स्पष्टीकरण |

 

मुंबई | काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिक भेट घेतली होती. या भेटीनंतर शिवसेना-भाजपा यांच्यातील दुरावा कमी झाला आहे अशी चर्चा सुरू झाली. त्यातच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली अशी बातमी शनिवारी माध्यमांमध्ये पसरली. तसेच उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.

मात्र या चर्चेवर संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं की, माझी कोणासोबतही भेट झाली नाही. काही दिवसांपूर्वी आशिष शेलारांना एका कार्यक्रमात भेटलो होतो. वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांना भेटतो, राजकारण म्हणजे हिंदूस्तान आणि पाकिस्तान नाही. त्यामुळे राजकारणात भेटीगाठी होत असतात असा खुलासा त्यांनी केला आहे.

त्याचसोबत महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अफवेमुळे राजकारण हलणार नाही. माझ्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. जनतेचे विषय मांडा, सभागृहात चर्चा करा. जेवढ्या अफवा पसरवाल तेवढं आम्ही मजबूत होऊ, माझ्यामुळे अडचणी निर्माण होणारे अशा अफवा पसरवत आहेत असा टोला संजय राऊतांनी नाव न घेता भाजपाला लगावला.

Team Global News Marathi: