खासदार नवनीत राणा कौर यांना हायकोर्टाचा दणका; जात प्रमाणपत्र रद्द करत 2 लाखाचा दंड

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. तसंच खासदार नवनीत राणा यांना उच्च न्यायालयाने दोन लाखांचा दंड देखील ठोठावला आहे.

नवनीत राणा या 2019 साली खासदारकीच्या निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. धनुका आणि न्या. बिश्त यांच्या खंडपीठानं मंगळवारी हा निर्णय दिला आहे. त्याचसोबत 2 लाखांचा दंड देखील सुनावला आहे.

उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेले प्रतिज्ञापत्र खोटं ठरल्यास त्या सदस्याचं पद रद्द करण्यात येऊ शकतं. त्यामुळेच नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र अजून त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: