खासदार कलाबेन डेलकर यांना शुभेच्छा देताना दरेकरांकडून टोले आणि टोमणे

 

मुंबई | लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकण्याची किमया केली. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून आलाय. आम्हाला आनंद आहे, दु:ख असण्याचं काहीच कारण नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. पण या शुभेच्छांबरोबरच त्यांनी सेनेला चिमटेही काढले आहेत.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह लगतच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ३० ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं तर काल मतमोजणीही झाली. या निवडणुकीत सेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा ५१ हजार मतांनी पराभव केला. यावर शुभेच्छा देताना विरोधकांनी आता सेनेला टोला सुद्धा लगावला आहे.

दरेकर म्हणाले की, ‘शिवसेनेच्या कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सगळं गुंडाळून ठेवलं. ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, मराठी अस्मितेला विरोध केला, स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्याशीच सेनेने हातमिळवणी केली. दादरा नगर हवेलीची जागा जिंकल्याने सेना जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा…!’

Team Global News Marathi: