मुंबई | मुंबई पोलीस दलातील अंमलदार ते सहाय्यक फौजदार यांची आता आठ तासांची डय़ुटी करण्यात आली आहे. अंमलदारांचे कामाचे आणि आरामाचे तास कसे असावेत याबाबत दोन-तीन प्रकार सुचविण्यात आले असून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱयांना सांगण्यात आले आहे.
यापूर्वी मुंबई पोलीस दलातील अंमलदारांसाठी आठ तासांची डय़ुटी सुरू करण्यात आली होती, परंतु कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागल्याने पोलिसांच्या कामाचे तास पुन्हा बदलण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला अंमलदारांसाठी 8 तासांची डय़ुटी सुरू केली.
अशातच 8 तासांची डय़ुटी सुरू केल्यापासून महिला अंमलदारांच्या कार्यक्षमतेत सकारात्मक बदल दिसून आल्याने आयुक्तांनी त्याची दखल घेत आता पुरुष अंमलदारांची डय़ुटी 8 तास आणि 16 तास आराम अशी केली आहे. मुंबई तसेच पोलीस ठाण्यापासून जवळ राहणाऱया अंमलदारांना 8 तास काम व 16 तास आराम अशी डय़ुटी देण्यात यावी.
पोलीस ठाण्यापासून 50 किमीपेक्षा लांब अंतरावर राहणाऱया अंमलदारांना 12 तास काम आणि 24 तास आराम अशा डय़ुटीचा पर्याय देण्यात यावा, परंतु अशी डय़ुटी करणाऱयांना साप्ताहिक सुट्टी देण्यात येणार नाही तसेच 55 वर्षांवरील तसेच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या अंमलदारांना 12 तास काम आणि 24 तास आराम अशी डय़ुटी देण्यात यावी असे आयुक्तांनी त्यांच्या लेखी आदेशात नमूद केले आहे.