बीड | माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ८ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम ३९५ वाढवण्याच्या आदेशाने खळबळ उडाली आहे. यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. ८ महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी विविध कलमे लावली होती. त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
यात दरोडा, बेकायदा घरात घुसने, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे, यासह शांतता भंग करणे आणि इतरही कलमे वाढणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्याचा राग मनात धरुन सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार माधुरी यांनी केली.