मोठी बातमी | भाजप खासदार निंबाळकर यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा

 

भाजपचे माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर त्यांच्यासह स्वराज नागरी पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापक विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे नमूद करूनदेखील पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्याने फिर्यादी दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिगंबर आगवणे हे मागील 15 वर्षांपासून खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. ‘खासदार निंबाळकर यांनी जवळिकीचा गैरफायदा घेत सहा वर्षांपूर्वी आपल्याला बोलावून घेतले आणि ‘मला पैशांची गरज असून, तुझ्या जागेची कागदपत्रे मला दे. तुझ्या नावाने कर्ज उचलून त्याची परतफेड मी करेन. तुला काही अडचण येणार नाही, काळजी करू नको,’ असे सांगून पुढील एक कोटीच्या कर्जाचा ‘व्यवहार’ केला.

मात्र, आता वसुली आपल्यामागे लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आपण फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, फलटण पोलिसांनी आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याने आपल्याला न्यायालयात जावे लागले,’ असे दिगंबर आगवणे यांनी सांगितले.

याप्रकरणी फलटण न्यायालयाने गुन्हा दाखल करून तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याबाबत 27 एप्रिल रोजी आदेश दिला होता. मात्र, त्या आदेशाविरुद्ध खासदार नाईक-निंबाळकर यांनी सातारा न्यायालयात दाद मागितली होती. तेव्हा न्यायालयाने फलटण न्यायालयाच्या आदेशास 9 मेपर्यंत स्थगिती दिली होती.

Team Global News Marathi: