भाजपमध्ये राहण्यातच संभाजीराजेंचा फायदा, रामदास आठवले यांचे विधान

 

-कोल्हापूरचे संभाजीराजे हे छत्रपती असल्याने, त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी भाजपसोबतच राहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यास ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या ना. आठवले यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोणती भूमिका घ्यायची, याचा अधिकार संभाजीराजे यांना आहे. कारण छत्रपती असल्याने ते निर्णय घेऊ शकतात. त्यांना स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी भाजपसोबत राहावे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यास ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलावा.

तसेच इंधन दरवाढ, महागाई हे विषय भाजपला आगामी निवडणुकीत अडचणीचे ठरणार का, यावर रामदास आठवले म्हणाले, महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने आणखी काही कर कमी केले पाहिजेत. केंद्राकडून राज्याला मिळणारे जीएसटीचे पैसे मिळावेत, यासाठी आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी बोलणार आहे.

राज्यात भाजपचे सरकार नाही म्हणून आम्ही महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. शरद पवारांनी साताऱ्यातील जकातवाडी येथील कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. याविषयी विचारले असता, हिंदू नाराज होतील अशा कविता पवारसाहेबांनी करू नयेत आणि भाजप नाराज होईल, अशी कविता म्हणू नये, अशी मिश्‍किल टिप्पणी आठवले यांनी केली.

Team Global News Marathi: