मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही अत्याचारी, मुक्ताईनगरमध्ये नाना पटोले यांची जोरदार बॅटिंग |

जळगाव | पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपाने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भारतीय जनता पक्षावर केली आहे.

आज पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या होम ग्राऊंडवर नाना पटोले यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार बॅटिंग केली. पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातल्या अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले. त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ५० वे अधिवेशन घेतले होते. त्याची प्रतिकृती म्हणून आज केंद्रात जे भाजपाचे सरकार आहे, ते इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे. त्यांनी आणलेल्या कायद्यांचे आज दहन केले आहे.

Team Global News Marathi: